अहमदनगर जिल्ह्यातील कोळपेवाडी हे माझे गाव. दूध-दुभत्याची समृद्धी, उसाची शेती असं माझं गाव अगदीच रमणीय. पंचक्रोशीतला सगळ्यात मोठा आठवडे बाजार आमच्या गावी असतो. माझ्या जन्माच्या आधीच आम्ही गावातला वाडा सोडून मळ्यातल्या घरात राहायला गेलो होतो. तिथं आंब्याच्या आणि लिंबाच्या सावलीत छोटंसं घर बांधलं. घरासमोर गाई-गुरांचा मोठा गोठा, पक्ष्यांचा अखंड किलबिलाट, आंब्याला लागलेले पाड अशा कितीतरी गमती तिथं मिळाल्या. सोबतची भावंडं आणि मित्रांसोबत सूरपारंब्या, कोया, गोट्या, सागरगोटे असे अनेक डाव रंगायचे. सायकलीवर शिर्डीला साई बाबाच्या दर्शनाला मित्रांबरोबर जाने, ऊन्ह-पाऊस झेलत पांदीच्या वाटेवरून अनवाणी पायानं शाळेला जाणं, पाय धुऊन प्रार्थनेला उभं राहणं, मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर उस खाण्याची चढाओढ लावणं, कबड्डीच्या स्पर्धेत भाग घेणे.. असे कितीतरी आनंदक्षण शाळेनं ओंजळीत दिले.
रविवारच्या बाजारात भाजी विकायला मी आईसोबत जायचो. तिथं दोन रुपयाची रुपयाची शेव आणि पेढा घेतला की होणारा आनंद अमूल्य असायचा. महेश्वारच्या आणि महादेवाच्या मंदिरातील धमाल, गणेशोत्सवातील पूजा आणि ओहोळाच्या पाण्यात त्याचं विसर्जन, नवरात्रात पहाटे देवीच्या दर्शनाला चालत जाणं म्हणजे तर मजाच मजा असायची.. शेतांच्या बांधावरून येता-जाताना मोहरी आणि सूर्यफुलाच्या सुवासानं मन मोहरून जायचं. वाऱ्यावर डोलणारी पिवळीधमक फुलं पाहताना प्रसन्न वाटायचं. अंगणातलं तुळशीवृंदावन आणि सदाफुली, दुथडी भरून वाहणारी गोदावरी नदी, उसाची आणि द्राक्ष्याची शेत, देवळं हे सारं डोळ्यापुढून हटत नाही. आता हे सगळंच आठवणीत जाऊन बसलं आहे! पुढे उच्यशिक्षण घेण्यासाठी गाव सोडण्याची वेळ आली तेव्हा माझं पाऊल तिथून निघत नव्हतं. निरोप घेताना आवंढा दाटून आला होता...
सुहास कोळपे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा