बहुचर्चित "सैराट" चित्रपट कालच बघितला. चित्रपट खूपच मस्त जमून आला आहे.
खूपच वास्तविकतेला धरून आहे. कुठेही बेगडी वां नाटकी वाटत नाही. अचूक
पात्रनिवड आणि कलाकारांचा अफलातून अभिनय ही चित्रपटाची महत्त्वाची बाजू.
रिंकू राजगुरुने अर्चनाच्या भूमिकेतून दिलेला इनोसंट अॅटिट्यूट लाजवाब आहे.
तिचे डोळे खूप बोलके आहेत. प्रशांत झालेला आकाश ठोसर, तानाजी गलगुंडे,
अरबाज शेख, छाया कदम, सुरेश विश्वकर्मा, सूरज पवार आदी सगळयांनीच मस्त कामं
केली आहेत. अजय-अतुल ची चारही गाणी खूपच मस्त आणि चित्रपटाला
चार चांद लावणारी आहेत. 'सैराट' हा नागराज मंजुळेचा दुसरा चित्रपट. सैराट
आणि फँड्री या दोन्हीचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही. पण या दोन्ही
चित्रपटांचे शेवट हा दोन्हीतला सामायिक धागा आहे. या दोन्हीत नागराजचा
"स्पेशल टच' आहे. 'फँड्री'तल्या 'जब्या'ने भिरकावलेला दगड आणि
'सैराट'मध्ये लहानग्याची रक्ताने माखलेली पावलं आपल्या काळजावर उमटत मनाला
सुन्न करतात. आजही समाजात अशा असंख्य घटना घडत असतात. आजही भारतीय समाजात
जाती-पाती, उच्य-नीच, आणि गरीब-श्रीमंत अश्या अनेक दऱ्या टिकून आहेत. आपण
माणूस म्हणून एकमेकांचे माणूसपण कधी स्वीकारणार? खर पाहिलं तर निसर्गात
दोनच मानवी जाती आहेत एक म्हणजे ती "नर" आणि दुसरी आहे ती "मादी".
मध्यमयुगीन मानसिकता सोडून आपण माणूस म्हणून एकमेकाचा सन्मान करायला हवा.
सैराट ने एका आठवड्यात अंदाजे २५ कोटी कमावले आहेत...मराठी प्रेक्षकांनी
नागराजच्या सैराट ला डोक्यावर घेऊन 5 स्टार दिले आहेत.. पहिला मराठी
सिनेमा 100 कोटींच्या घरात पोहचो हीच मनापासून हार्दिक शुभेच्या..!!!
